नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी दिवसभरात 48 हजार 661 जणांची भर पडली. त्यामुळे बाधितांच्या संख्येने 14 लाखाचा टप्पा ओलांडला. त्याचवेळी करोनातून बरे झालेल्यांची संख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
देशातील मृतांची संख्या सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार 32 हजार 063 वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात 705 जणांनी करोनामुळे प्राण गमावले. देशांत सध्या सक्रीय बाधितांची संख्या चार लाख 67 हजार 882 आहे. बाधित बरे होण्याची टक्केवारी 63.92 टक्क्यांवर पोहोचली आहे. बाधितांच्या संख्येत काही परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
सलग चौथ्या दिवशी 45 हजार जणांपेक्षा अधिक बाधित झाले. एक कोटी 60 लाख चाचण्याचा टप्पाही देशाने पूर्ण केला आहे. आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, एक कोटी 62 लाख 91 हजार 331 चाचण्या घेण्यात आल्या. 25 जुलैला एका दिवसांत चार लाख 42 हजार 263 चाचण्या घेण्यात आल्या. हा एका दिवसांतील चाचण्यांचा उच्चांक आहे.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील 257, तमिळनाडूतील 89, कर्नाटकातील 72, आंध्रातील 52 जणांचा समावेश आहे.