नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राजस्थानच्या राजसमंदमधील एका कुटुंबाला पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. पोलिसांनी ओंकारलाल यांचा मृतदेह दहा दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी ओंकारलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पिंडदानदेखील करण्यात आलं. मात्र तेच ओंकारलाल १० दिवसांनी जिवंत परतले. त्यामुळे कुटुंबाच्या आनंद गगनात मावेनासा झाला.

दरम्यान, ११ मे रोजी मोही रोडवर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी रुग्णवाहिकेतून तो आर. के. जिल्हा रुग्णालयात नेला. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं कांकरोली पोलिसांना पत्र पाठवून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं. मात्र काहीच माहिती हाती लागली नाही. यानंतर १५ मे रोजी मुख्य हवालदार मोहनलाल रुग्णालयात पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे त्यांनी कांकरोलीतील विवेकानंद चौकात राहणारे ओंकारलालचे बंधू नानालाल आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. भाऊ ओंकारलालच्या उजव्या हाताच्या मनगटापासून कोपरापर्यंत जखमेची खूण आहे. डाव्या हाताची दोन बोटं वळलेली असल्याचं नानालाल यांनी पोलिसांना सांगितलं. मात्र रुग्णालयात असलेला मृतदेह ओंकारलालचाच असल्याचं पोलिसांनी ठामपणे सांगितलं. मृतदेह ३ दिवसांपासून शवागारात असल्यानं हातावरील खूण दिसत नसल्याचं सांगत पोलिसांनी शवविच्छेदन न करताच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
दरम्यान, १५ मे रोजी ओंकारलालच्या मुलानं मुंडण करून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतरचे सर्व विधीदेखील पूर्ण करण्यात आले. कुटुंब शोकसागरात बुडालं असताना अचानक २३ मे रोजी ओंकारलाल घरी पोहोचल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपण कुटुंबातील कोणालाच न सांगता ११ मे रोजी उदयपूरला गेलो होतो असं ओंकारलाल यांनी सांगितलं. तिथे प्रकृती बिघडल्यानं ४ दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर ओंकारलाल ६ दिवस पैसे संपल्यानं उदयपूरमध्येच भटकत होते.







