यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिंगणे शिवारात आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. तपासातील विचित्र बाब म्हणजे, महिलेचा खून झाल्याचे, तसेच तिचा संशयित मारेकरी देखील गजाआड झाला असला तरी मात्र त्या महिलेची कुठलीच ओळख अद्यापही पटलेली नाही. पोलिसांनी जीवाचे रान करून घटना उघड केली आहे. आता महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.
हिंगोणा शिवारात २८ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह साबीर खान शब्बीर खान यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता. तपासाअंती महिलेची ओळख पटली नाही, म्हणून तिच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केला. मात्र, तपास सुरूच ठेवला होता. नंतर त्यांनी फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व गावांत खबरींकडून माहिती घेण्याचे काम सुरु केले होते.
अखेर एका गोपनीय माहितीवरून महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला. सदर महिलेचा खून झाला असून तो खुमसिंग सरदार बारेला (रा. मोर धरणाजवळ हिंगोणा ता. यावल) याने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार फैजपूर पोलिस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खुमसिंग बारेला यास अटक करण्यात आली आहे. या घटनेतील मयत अनोळखी महिला संशयीत तरुणासोबत त्याच्या घरी आली होती.
त्यावेळी मयत महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तु तुझ्या घरी निघून जामी तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल असे त्याने तिला म्हटले होते. यावेळी दोघांत वाद झाला. खुमसिंग याने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तिला साबीर खान यांच्या शेतातील विहीरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, ती महिला कोण होती, त्याचा उलगडा झाला नाही. पोलिसांनी तपासचक्रे वेगवान केली असून संशयित खुमसिंग बारेला यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास स.पो.नि. निलेश वाघ करत आहेत.