जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर कॉलनीतील चार घरातून सहा मोबाईल चोरणाऱ्या दोन संशयित आरोपींना एरंडोल येथून अटक करण्यात आली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल वासुदेव शिपी, रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव यांच्या राहते घरातून मोबाईल तसेच त्याच परिसरात राहणारे शुभम आनंदा अहिरे, रेखाबाई उध्दव जाधव, मंगेश मोहन सोनवणे यांचे घरातुन चोरट्यांनी एकुण ६ मोबाईल चोरून नेले होते . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दि.२० जून रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना सदरची चोरी ही योगेश राजेंद्र चौधरी, रा आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव व सुधीर सुभाष भोई, रा- साईबाबा मंदिराजवळ, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव यांनी केल्याबाबतची माहिती मिळाली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, नाना तायडे, मुकेश पाटील व साईनाथ मुंढे यांनी शनिवार, दि. २५ जून रोजी सकाळी एरंडोल येथून दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे.