वाकोद येथील राणीदानजी जैन विद्यालयाच्या २०००-०१ बॅचचे स्नेहसंमेलन; गुरुजनांचा सन्मान
जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील वाकोद येथे शाळेचा तोच परिसर, तोच वर्ग आणि बाकावर सोबत बसणारे तेच जुने मित्र-मैत्रिणी… निमित्त होते पंचवीस वर्षांनंतर भरलेल्या ‘माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे’. स्व. राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय, वाकोद येथील सन २०००-२००१ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. केवळ गप्पागोष्टींवर न थांबता, या संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘व्यसनमुक्तीची’ शपथ घेत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या निवृत्त व कार्यरत शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पी. बी. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, डी. एस. पाटील, ए. डी. बावस्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अर्पण लोढा, सचिन सरदार, अनिल जाधव, उज्वला गोसावी, ज्योती चौधरी, सीमा देशमुख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील खोड्या आणि गुरुजनांचे संस्कार यांवर प्रकाश टाकला. शिक्षकांनीही आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थी घडताना पाहणे हाच शिक्षकाचा खरा आनंद असतो,” अशा भावना व्यक्त केल्या.
आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना, या माजी विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. “आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा आणि व्यसनांपासून दूर राहा,” असा संदेश देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या साक्षीने व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे परिसरातील पहिलेच स्नेहसंमेलन ठरल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी लोहारा शाळेचे उपमुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे आणि जामनेर येथील धनराळे क्लासेसचे संचालक योगेंद्र धनराळे यांनी आपल्या बहारदार गायनाने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पण लोढा यांनी केले, तर आभार अनिल जाधव यांनी मानले. या यशस्वी आयोजनासाठी विजय देठे, नाना पांढरे, अनिल पाटील, मिलिंद जैन, शरद पाटील, किरण जाधव, भागवत जाधव, संजुगीर गोसावी यांसह सन २००० मधील सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.









