जळगाव (प्रतिनिधी) – शहरात घरफोडीच्या घटना सुरु आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या धनाजी काळे नगरमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली होती. या घटनेतील सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी राजेश डिगंबर सोनवणे यांचे धनाजी काळे नगरात घर आहे. याठिकाणी कोणीच राहत नसल्याने ते घर बंदच होते. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी घराला लावलेले तीन लोखंडी दरवाजे, बाथरुमचे स्लाईडींगचे दरवाजे, बोअरींगचे पाईप व मोटार, इलेक्ट्रॉनिक्सचे बोर्ड व वायर,वजन काटा, भांडे ठेवण्याचे रॅक व लोखंडी साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. चोरट्यांनी घरफोडी केल्यानंतर चोरुन नेलेले साहित्य गेंदालाल मिल कॉम्पलेक्समध्ये लपवून ठेवले होते. हे साहित्य विक्री करण्यासाठी ते मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घेवून जात असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घरफोडीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपी अजित रशिद पठाण (३२), शंकर विश्वनाथ साबणे (१८), हकिम मोहम्मद नूर शहा (२०) सर्व रा. गेंदालाल मिल या तिघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. हे तिघ सराईत गुन्हेगार असून यापुर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, गणेश पाटील, रतन गिते, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांच्या पथकाने कामगिरी बजावली.