जळगाव (प्रतिनिधी) – पाचोऱ्यातील एका शेतकऱ्याने शेतजमिनीच्या उतार्यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दिला होता. या कामाच्या मोबदल्यात 11 हजारांची लाचेची मागणी पाचोरा तहसील कार्यालयाच्या लिपिक टंकलेखकाने केली. मात्र, तक्रारदाराने तक्रार केल्यावर सदर लिपिकाला खाजगी पंटरासह जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे.
पाचोरा तालुक्यातील ४८ वर्षीय शेतकरी त्यांच्या बहिणींच्या नावाने असलेल्या शेत जमिनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केलं होते. त्यासाठी कार्यालयातील लिपिक टंकलेखक प्रशांत किसन सावकारे (30, रा.पाचोरा) तसेच खाजगी इसम यादव केशव पवार (60, रा.भोजे, ता.पाचोरा) यांनी तक्रारदारास १७ जुलै रोजी काम करण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दोघांविरोधात तक्रार केली.
तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला, दरम्यान मागील महिन्यात लिपिक टंकलेखक प्रशांत सावकारे याची पाचोऱ्यातून चाळीसगाव तहसील कार्यालयात बदली झाली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी प्रशांत सावकारे याला खाजगी इसम यादव पवारसह अटक केली आहे.
कारवाई पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक सुनील शिरसाठ, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.