हैदराबाद (वृत्तसंस्था) – ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी कंबर कसली आहे. हैदराबादमधील विविध भागात जाऊन शेलार यांनी मराठी भाषिकांशी संवाद साधला.
‘ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात हैदराबादमधील याकतपुरा विधानसभेतील कूर्मगुडा विभागातील मराठी भाषिकांशी संवाद साधला आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले’ अशी माहिती आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे दिली. त्याआधी त्यांनी मलकपेठ विधानसभेतील मराठी भाषिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, तर आशिष शेलार यांच्याकडे सहप्रभारी म्हणून कार्यभार सोपवला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी, माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी पद सोपवले आहे. त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.







