महाड (वृत्तसंस्था)- महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारीक गार्डन ही पाच मजली इमारत काल सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून एनडीआरएफतर्फे ढिगारे उपसण्याची काम सुरु आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.

राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं असून सरकारच्या या घोषणेवर आमदार नितेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत राणे यांनी, ‘रायगड ला अजुन निसर्ग वादळ ची पुर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही.. आता कालच्या इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे.. या विश्वासघाती सरकार वर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ???’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल इमारत कोसळल्याची माहिती मिळताच याबाबत आमदार भारत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली होती. या जलदगतीने बचावकार्य कानी मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
महाड दुर्घटनेबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत पाच जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. बचावकार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.







