नागपूर ( प्रतिनिधी ) – गोंदिया तालुक्याशेजारील मध्य प्रदेशमधील बालघाट तालुक्यामधील किरणापूर शहरात एका महिलेने बालाघाटच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला आहे. ही शस्त्रक्रिया २३ मे रोजी रात्री पार पाडली. ही चारही बाळं निरोगी आणि पुर्णपणे स्वस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जन्मलेल्या चार बाळांपैकी तीन मुलं आणि एक मुलगी आहे. बालाघाट जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. सिव्हिल सर्जन डॉ. संजय धाबरगावे यांनी सांगितले की, २३ मे रोजी किरणापूर तालुक्यातील जरही येथील प्रीती नंदलाल मेश्राम यांच्यावरील प्रसुतीच्या शस्त्रक्रीया झाली. प्रीती यांनी चार बाळांना जन्म दिला आहे.
ट्रॉमा युनिटच्या तज्ज्ञ पथकात डॉ. रश्मी वाघमारे आणि भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश मेश्राम, परिचारिका सरिता मेश्राम आणि त्यांच्या कुशल पथकाने रात्री ११:३० वाजता २६ वर्षीय प्रीती यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या.. चारही बाळांना देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. आरोग्य अधिकारी डॉ.मनोज पांडे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.