मुंबई (वृत्तसंस्था) – तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधी पक्ष टीका करतच आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी कोकणात वादळ चार तास थांबलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, अशी टीका प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस 700 किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बगायतदारांशी संवाद साधला. त्यांच दु:ख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत, अशी टीका दरेकरांनी केली.
मुख्यमंत्री स्वत: खासगी विमान घेऊन रत्नागिरीला आले होते. त्यांनी विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्याना विमानतळावर बोलावून बैठक घेतली. बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले. अधिकाऱ्यांना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले. स्वतः विमानाने दौरा करायचा आणि पंतप्रधानांच्या हवाई दौऱ्यावर टीका करायची ही कोणती पद्धत आहे?, असा सवाल प्रविण दरेकरांनी केला आहे.
सगळ्या मंत्र्यांनी तात्काळ पंचनामे होतील, असं सांगितलं. मात्र आठवडा उलटून गेला तरी देखील पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री पंचनामे झाल्यावर मदत जाहीर करू असे सांगतात. पंचनाम्याच्या नावाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.







