नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठे सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नाव बदलण्यात आला आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून मोटेरा स्टेडियम ओळखले जाते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अहमदाबादमधील या स्टेडियमचे उदघाटन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेलही उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांसह या स्टेडियममध्ये आज भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरी टेस्ट सिरीज खेळण्यात येणार आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता.
या स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, बॅटमिंटन, जलतरण या क्रीडा प्रकारांसाठीही अतिरिक्त संकुल या स्टेडियमच्या प्रांगणात तयार करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम, मिटींग रूम, सेंट्रल एसी आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या स्टेडियमच्या सज्जतेसाठी जवळपास 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.