जळगाव (प्रतिनिधी) – कंपनीतून घरी पायी निघालेला १८ वर्षीय तरूण मोबाईलवर बोलत असतांना मागुन भरधाव वेगाने दुचाकीवरून येवून दोन चोरट्यांनी मोबाईल हिसकावून पळ काढला होता. यातील एका संशयित आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुभान शेख इस्माईल शेख (वय २४, रा.ख्वॉजानगर, पिंप्राळ हुडको) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, सुरज नाना पाटील (वय १८, रा. राम मंदीरजवळ, अयोध्यानगर) हा एमआयडीसीतील जगवाणी कंपनीत कामाला जातो. त्याच्याकडे काका धर्मराज मांगो पाटील यांचा १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल तात्पुरता वापरण्यासाठी घेतला होता. ११ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना गुरांच्या मार्केटजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईलवर बोलत असतांना हातातील मोबाईल बळजबरी हिसकावून नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या माहितीवरुन सोमवारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी, महेंद्रसिंग पाटील, मुदस्सर काझी, इमरान सैय्यद, सतीष गर्जे, सचिन पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील यांच्या पथकाने सुभान शेख याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुभान याने यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे.