नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- काँग्रेसच्या कार्यकारी समिती सकाळपासून महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. तर या मागणीला विरोध करणारा दुसरा गट झाला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरुन सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.
सूत्राच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षाचा संघर्ष सुरु असताना आणि सोनिया गांधी आजारी असताना हे पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विचारला आहे. पक्षाध्यक्षांना पाठवलेले पत्र लीक झाल्यामुळे आपल्याला दु:ख झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींना संपूर्ण सत्रासाठी अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली आहे.







