नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी विनाशर्त माफी मागण्यास नकार दिला आहे. भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आपले निवेदन सादर केले. यामध्ये प्रशांत भूषण यांनी माझे वक्तव्य सद्भावनापूर्वक होते आणि माफी मागितली तर माझ्या विवेकाचा अपमान होईल, असे सांगितले आहे.

प्रशांत भूषण म्हंटले कि, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय ही शेवटची आशा आहे. माझे विधान सद्भावनेने होते आणि मी न्यायालयाकडे माफी मागितल्यास माझ्या विवेकाचा आणि ज्या संस्थेवर माझा विश्वास आहे त्याचा अपमान होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
न्यायालयाचा अवमान करणाऱ्या दोन ट्विट प्रकरणात भूषण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र त्यांनी न्यायालयाची माफी मागणारे निवेदन सादर केल्यावर शिक्षेबाबत फेरविचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. भूषण यांनी आपल्या वकिलाशी चर्चा करून मगच निवेदन सादर करावे, असे न्या. अरुण मिश्रा यांनी सांगितले होते. मात्र, आज निवेदन सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी न्यायालय प्रशांत भूषण यांच्याविरोधात निर्णय देणार आहे.







