बोदवड (प्रतिनिधी) – शहरात तहसील कार्यालयजवळ परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाजवळ गावठी कट्टा सापडला आहे. त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
जामनेर रस्त्यावरील तहसील कार्यालय जवळपास एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असून त्याच्या जवळ गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दि.२२ रोजी सायंकाळी मिळाली. पोलीस निरिक्षक व पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचला आणि न.ह.राका हायस्कुलसमोर रात्री ८ वाजेच्या जामनेर रोडने एक इसम हा संशयास्पदरित्या फिरतांना दिसला. सदर इसमावरती संशय बळावल्याने त्यास पोलीसांनी अडवुन विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तर देऊ लागला. विचारपूस करता त्याने त्याचे नाव दिपक दादाराव शेजोळे, वय- 22 वर्ष, रा. येवती ता. बोदवड ह.मु. नानेकरवाडी, चाकण, पुणे असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅकझीन सह व १ जिवंत काडतुस मिळुन आले. त्यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे विरुध्द बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ,स.पो.नि. अंकुश जाधव, पोकॉ मुकेश पाटील, पोकॉ भगवान पाटील, पोकॉ निखिल नारखेडे,निलेश सिसोदे यांनी केलेली आहे.