जळगाव (प्रतिनिधी) – स्वस्तातील सोन्याच्या वादातून नगर जिल्ह्यात चार जणांची हत्या करणार्या पाच संशयितांना जळगावातून अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात दोन महिलांचाही समावेश आहे.
नगर जिल्ह्यातील काही जणांनी जळगावच्या हरिविठ्ठल नगरातील काही जणांना कोट्यवधी रूपयांचे सोने स्वस्तात देण्याचे आमीष दाखविले होते. यावेळी त्यांनी सोबत शस्त्रे देखील घेतलेली होती. श्रीगोंदा तालुक्यातील विसेपूर फाट्याजवळ गुरूवारी सायंकाळी त्यांची भेट झाली. याप्रसंगी समोरच्यांनी जळगावच्या लोकांना बनावट सोने देऊन त्यांच्या कडील पैशांची बॅग घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात जळगावच्या लोकांनी आपल्याकडील हत्यारांनी वार करत चौघांचा खून केला.
या हाणामारीत सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण (४० ), नागेश कुंजीलाल चव्हाण (१६ ), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (२२) यांचा खून झाला. एकाच वेळी चौघांचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस पथकांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना घटनास्थळी ओळखपत्र आणि एटीएम कार्ड मिळाले. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचले असल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना याबाबत संपर्क करण्यात आला. त्यांनी एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.
एलसीबीच्या पथकाने कसून तपास करत जळगावातल्य हरीविठ्ठल नगरातील नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय२२); कल्पना किशोर सपकाळे (वय ४०); आशाबाई जगदीश सोनवणे (वय ४२); प्रेमराज रमेश पाटील (वय२२) आणि योगेश मोहन ठाकूर ( वय२२) या पाच संशयितांना शनिवारी सकाळी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिन्ही पुरूष हे बाविशीतले तर दोन महिला चाळीशीतल्या आहेत.