कुटुंबियांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पिंप्राळा शिवारातील सालदार गोविंद श्रावण बारी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित करीत पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी कुटुंबीयांनी १९ ऑक्टोबर रोजी लेखी अर्जाद्वारे न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गोविंदा बारी यांचे शव विच्छेदन केल्यावर त्यांचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला नाही असाही महत्वाचा आरोप नातेवाईकांचा आहे.
याप्रकरणी मयत गोविंदा बारी यांच्या पत्नी प्रतिभा बारी (काटोले) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोविंदा बारी हे शेतमालक निलेश लक्ष्मीनारायण दुबे यांच्या शेतात सालदार म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. हे निलेश दुबे खुनशी व आडदांड प्रवृत्तीचे आहे. ते पती गोविंद बारी यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत. प्रसंगी मारहाण करीत. तसेच जीवे करण्याचीही भाषा करायचे याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली मात्र, तक्रारीची अद्यापही कुठलीही दाखल घेतली गेलेली नाही.
दि. १० ऑक्टोबर रोजी पती गोविंदा यांना शेत मालक निलेश दुबे हा घरून जबरदस्ती घेऊन गेला. संध्याकाळपर्यंत पती घरी आले नाही म्हणून शेत मालकाला विचारले असता, त्याने, माझी बैल जोडी चोरीला गेलेली असून तुझ्याच पटीने चोरली असावी म्हणून तो घरी येत नाही. असे सांगून निलेश दुबे याने, जर माझी बैलजोडी मिळाली नाही तर मी त्याला जिवंत सोडणार नाही असे सांगून मला घरी हाकलून लावले. असेही निवेदनात म्हटले आहे. यानंतर पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री ८ वाजेनंतर शेत मालकाच्या बाजूला शेती करणारे पिंटू कोळी यांनी गोविंदाच्या बाबतीत शेतात काहीतरी झाले आहे. असे सांगितले. त्यावरून नातेवाईक व गल्लीतील मुले शेताकडे धावले असता, पती गोविंदांचा मृतदेह कडुलिंबाच्या झाडावर संशयास्पद स्थितीत फासावर लटकलेला दिसला. मुळात ते झाड व पतीची शरीराची उंची याचा विचार केला असता. पतीने गळफास घेणे शक्य नाही. त्यांची शेतमालकानेच हत्या केली असावी. असा संशय देखील निवेदनात प्रतिभा बारी यांनी व्यक्त केला आहे. जागेचे निरीक्षण केले असता, तेथे झटपट झाल्याचे दिसत होते. रामानंद नगर पोलिसांनी कुठलीही तपासणी केली नाही. जबजबाबही नोंदविले नाही. आजूबाजूच्या शेत मजुरांचे जबाब घेतल्यास सत्य समोर येण्याची शक्यता देखील प्रतिभा बारी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.