पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आज (२२ नोव्हेंबर) पुण्यात आहेत.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. त्यावेळी कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आपण आणि दिलीप वळसे पाटील यांनी एवढी काळजी घेतली तरीही कोरोना झाला. त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत..
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आषाढीवारीनंतर आता कार्तिकी वारीसाठीही आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. कोरोनाची लस शोधण्याचं काम सुरु आहे. सिरमसारख्या संस्था त्यावर काम करत आहेत. राज्यातील सर्व लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार तयारी करत असल्याची माहितीही अजितदादांनी दिली. असं असलं तरी कुणीही गाफिल राहू नका, योग्य खबरदारी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम पार पडला.







