सिंधुदुर्ग(वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) कोकण दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच, तात्पुरते नाही कायमस्वरूपाचे काम करून घ्यायचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
पुढे मुख्यमंत्री असं म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
‘विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीदेखील पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचं कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून योग्य ती मदत करतील असा विश्वास आहे. राज्य म्हणून आम्हाला शक्य आहे ती सर्व मदत करु,’ असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. ‘बदलत्या हवामानामुळे राज्याच्या किनारपट्टीवर वादळं येऊ लागली आहेत. तौतेची भीषणता गेल्या दोन दशकातील सर्वाधिक होती. वादळांमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरुपी आराखडा जिल्ह्यांनी तयार केला असून तो जलदगतीने पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी आणि निधी द्यावा,’ अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
केंद्र सरकारनेही अधिकाधिक मदत करावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसं आम्ही त्यांना कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असा चिमटा काढतानाच आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही ते म्हणाले.
सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. समुद्राजवळ जमिनीखालून विजेच्या वायरी टाकणे, वादळाच्या पार्श्वूभूमीवर अनेकांचं स्थलांतर करावं लागतं. अशा लोकांना कायमस्वरुपी निवारा देणं आदी गोष्टी करण्यात येणार आहे. हा कायमस्वरुपी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत द्यावी, मग ती निधीची असेल किंवा मंजुरीची असेल, ती मदत आम्हाला केंद्राने द्यायला हवी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे, असं त्यांनी सांगितलं.
वादळात आंबा, फळबागांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीला मोठे फटके बसले आहेत. मच्छिमारांचंही नुकसान झालं आहे. प्रत्येकाला मदत केली जाईल. कुणालाही नाराज करणार नाही. दोन दिवसात अहवाल येईल. त्यावेळी निर्णय घेणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.