जळगाव ( प्रतिनिधी ) – समोरुन येणारे दुचाकीस्वार ट्रालाच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या नाना नथ्थू माळी (वय-४०, रा.फुले नगर, पाळधी ता.धरणगाव) यांचा चिरडून मृत्यू झाल्याची ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोर सोमवारी २० जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, दुचाकीस्वाराला वाचविण्याचा नादात ट्रालावरील चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रालाची मागचा भाग कॅबीनपासून तुटून तो रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पडला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील फुले नगरात नाना माळी हे वास्तव्यास असून ते ट्रॅक्टवर चालक म्हणून काम करतात. काही कामानिनित्त नाना माळी हे एकाजणासोबत त्यांच्या (एमएच १९ डीक्यू ८७४९) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावात आले होते. काम आटोपून ते सोमवारी २० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोरुन जात असतांना एका दुचाकीचा नाना माळी यांच्या दुचाकीला कट लागला. यात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरुन येणार्या (आरजे ०१ जीबी ६४६५) क्रमांकाच्या ट्रालाच्या समोर आली. दुचाकी अचानक समोर आल्याने ट्रकचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीच्या मागे बसलेले नाना माळी हे ट्रालाच्या चाकाखाली येवून चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.