जेद्दाह (वृत्तसंस्था) – जगभरात करोनामुळे लोकांचे रोजगार जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. आता हेच संकट सौदीतील भारतीय कामगारांवर आले आहे. तेथे काम करणाऱ्या हजारो भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांनी भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे.
सौदीतील लॉकडाउनच्या काळात नोकरी गेल्याने आता या कामगारांसमोर मायदेशी परतण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. या कामगारांची रवानगी डिटेंन्शन कॅम्पमध्ये करण्यात आली असून येत्या काही दिवसांत भारतीय दूतावासाने त्यांची परत मायदेशी जाण्याची व्यवस्था करावी असेही संकेत सौदी सरकारने दिले आहेत.
यातील बहुसंख्य कामगार दक्षिण भारतातून तेथे गेले होते. तसेच उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब व महाराष्ट्रातील कामगारांचीही संख्या मोठी आहे. त्यातील काही कामगारांना देण्यात आलेली काम करण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
भारताव्यतरीक्त जे कामगार पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशातून आले होते त्यांना त्यांच्या देशातील सरकारने मायदेशी आणण्याची व्यवस्था केली आहे. आता भारत सरकार काय निर्णय घेते यावर या कामगारांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे.