आग्रा (उत्तर प्रदेश) – अलाहाबादचे नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनले अयोध्या, मुघलसरायचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले जाणार आहे. हा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता. योगींच्या या निर्णयाचे आता शिवसेनेने कौतुक केले आहे

दरम्यान, आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले यात श्रद्धा, आदर आणि तितकेच भविष्यातील राजकारण आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या, लेखामध्ये म्हटले आहे.
काय आहे सामानाचा लेख
आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजीराजे पोहोचले व त्यांनी औरंगजेबाच्या हातातली तलवार खेचून घेतली असेच नाट्य जणू घडत आहे. आग्य्रातील ‘मुगल म्युझियम’चे नाव मुख्यमंत्री योगी महाराजांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले यात श्रद्धा, आदर, तितकेच भविष्यातले राजकारण आहे.
उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहण्याइतकेच हे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म आहे. अमुक-तमुक त्याच्या क्षेत्रातील ‘छत्रपती शिवाजी’ आहे असे म्हणणे म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात शिखरच गाठले असा अर्थ होतो. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी छत्रपतींचा उल्लेख फक्त ‘शिवाजी’ असाच केला जात असे. हे एकेरी संबोधन आता सगळय़ांना खटकते, पण त्या संबोधनात भक्ती व आदर होता. एका शिवजयंती उत्सवात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले.’ चिपळूणकरांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणत असत. या उक्तीचे समर्थन आणि स्पष्टीकरण नागपूरचे डॉ. वि. भि. कोलते असे करतात.
छत्रपती शिवराय यांच्या अवतारकार्यात ‘आग्र्याहून सुटका’ या रोमांचक नाटय़ास कमालीचे महत्त्व आहे. असे नाट्य कोणत्याही राजाच्या जीवनात घडले नसेल. त्या काळात वर्तमानपत्रे किंवा आजच्यासारख्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. त्या असत्या तर ‘आग्य्राहून सुटका’ हे थरारक नाट्य त्यांनी किमान वर्षभर चोवीस तास दाखवले असते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोमवारी आग्रा येथे आले. आग्रा येथे बनत असलेल्या मुगल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणाच त्यांनी केली. देशाचा ‘महानायक’ मुगल कसा असू शकतो? तो हिंदुपदपातशहाच असू शकतो. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले. यामागे थोडी राजकीय विचारांची ठिणगी असायला हवी.







