अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे काल शनिवार दि. १९ रोजी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत ६९ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.
निंभोरा येथील फिर्यादी कैलास साहेबराव पाटील (वय ५२) हे पत्नीसह शेती व्यवसाय करत असून मुले सुरत येथे कामाला असतात. काल नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता ते तुळशीवृंदावनाच्या दिव्याखाली घराची चावी ठेवून शेतात गेले. त्यानंतर दुपारी दोन वाजता येवुन पाहिले असता घरातील ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. चोरट्यांनी ६७ हजाराचे सोन्याचे दागिने व दोन हजार रोख रक्कम चोरून नेल्याने मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय संतोष पवार करीत आहेत.








