यावल (प्रतिनिधी) – यावल नगरपालिकेच्या हद्दीतील शहराला पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलावाच्या कामास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली,असून त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल शहराला हातनुर धरणावरून पाटचारी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाटचारीतून पाणी नगरपरिषदेने १९९४ साली बांधण्यात आलेल्या ३०० एम एल डी क्षमतेच्या साठवण तलावात साठवणूक करून त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी जलकुंभ द्वारे शहराला पुरविण्यात येत होते. मात्र सदर तलाव पंचवीस वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात गळती होऊन साठा तीन महिन्याने ऐवजी पन्नास दिवस पुरेल एवढा साठवण होत होता. ही अडचण लक्षात घेऊन नगरपरिषदेने २२ फेब्रुवारी २०१७ व १३ मार्च २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नवीन साठवण तलाव बांधण्याच्या विषयास मंजुरी घेतली होती, मात्र तीन-साडेतीन वर्ष होऊन देखील सदर तलावाचे काम रखडले होते, नंतरच्या काळात राकेश कोलते प्रभारी नगराध्यक्ष झाल्यानंतर नगर परिषदेचे गटनेते माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सदर कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांचेकडून तांत्रिक मंजुरी मिळवून दिनांक २५ /०६ /२०२० रोजी प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. सदर कामास माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी १४ वित्त आयोग या योजनेतून मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. नौशाद तडवी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.
पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद– माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील
जुन्या साठवण तलावात गळती होत असल्याने त्याची दुरुस्ती व्हावे व दुरुस्ती पूर्वी नवीन साठवण तलाव बांधण्यात यावा अशी आपली अनेक दिवसांपासूनची मागणी होती व तसा ठराव देखील फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. मात्र तीन वर्ष या कामास प्राधान्य न दिल्याने काम रखडले होते. नगरपालिकेवर आमची सत्ता येताच आम्ही या कामाचा पाठपुरावा केला मंजूर करण्यात आलेला नवीन तलाव शंभर एम एल डी क्षमतेचा आहे व जुना तलाव ३०० एम एल डी क्षमतेचा आहे. जुना तलाव दुरुस्ती झाल्यावर नव्या व जुन्या साठवण तलावातून शहराला चार महिने पुरेल एवढा साठा करता येणार आहे. यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून वर्षभरासाठी सहा ते सात आवर्तन घ्यावे लागत होते आता मात्र पाटबंधारे विभागातून वर्षातून फक्त तीन आवर्तन मिळाले तरी शहराची तहान भागवता येणार आहे. यामुळे पाटबंधारे विभागाला आवर्तन साठी नगरपरिषदेकडून देण्यात येणारा जास्तीचा पैसा देखील वाचणार आहे व दरवर्षी उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची आपली मागणी पूर्ण होत असल्याने व केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंदच आहे.







