मुंबई (वृत्तसंस्था) – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआयकडे सोपवला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, अशी मला आशा आहे, अशी टीकात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले कि, मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरतपणे झटणारे आणि समाजात पुरोगामी विचारसरणीला चालना देण्यासाठी कार्यरत असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.20) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सात वर्षे उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सीबीआय या प्रतिष्ठित तपास यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही.







