लखनऊ (वृत्तसंस्था) – राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. या विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटायला गेले असता उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलनास सुरुवात केली आहे. यामुळे युपी सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे.







