जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव कारागृहातुन आरोपी फरार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी अद्याप मुख्य संशयित आरोपी फरारच असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १ रोजी आरोपींना पिस्तुल व काडतूस पुरविणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.
नागेश मुकुंदा पिंगळे (वय -२९, रा.अमळनेर) व अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी (रा रामेश्वर कोलनी, जळगाव) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपासाधिकारी बापू रोहोम यांनी सागर पाटीलसह १ रोजी अटक केलेल्या नागेश व अमीत उर्फ नितेश यांना बुधवारी ऑनलाईन न्यायालयात हजर केले असता तिघांना ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुशील मगरे व गौरव पाटील यांच्याबाबत सागर पाटील याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. अमीत व जगदिश या दोघांनी गणेश नगराकडून कारागृहात भिंतीवरून काडतूस व पिस्तुल फेकून मगरे याला पुरविले आहे. शिंदखेडा येथील एका जणाने जगदीश पाटील याला गावठी पिस्तुल पुरविल्याचेही उघड झाले आहे.
पुण्यातील कोथरुडमध्ये सोने विक्रीच्या दुकानात शस्त्रधारी दोघांनी दरोडा टाकला होता. त्यात सुशील मगरे यांच्यासोबत आता अटक केलेला अमित हा देखील होता, अमीत हा मुळचा बिहारचा असून रामेश्वर कॉलोनीत वडीलांसोबत इलेकट्रिक फिटिंगचे काम करतो, मगरेच्या संपर्कात आल्याने धाडसी गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला.