नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील सामनगाव रोडवर गाडेकर मळ्यात एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी लालबाबू यादव (वय 9) असं मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता. यादव कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही आढळून आला नाही.
शाळेत, नातेकवाईकांकडे चौकशी करण्यात आली पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. मंगळवारी दुपारी शेजारी राहणार्या तरुणाने आपल्या मुलगा रामजीला बरोबर नेल्याचे पालकांनी पाहिले होते. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजी यादवकडे चौकशी केली. त्यावेळी या तरुणाने रामजीच्या आई-वडिलांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे विचारणी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली.