सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या

पालकांचा हृद्य सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) – आपल्या आयुष्यामध्ये उत्साह आणि जिद्द ठेवली तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर प्रवीण धीमन यांनी केले.

येथील नूतन मराठा महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रवीण धीमान बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख तर प्रमुख पाहुणे लेफ्टनंट राहुल पाटील उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनसीसी युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
यावेळी चाळीसगाव येथील रहिवासी शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लेफ्टनंट राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी कमांडिंग अधिकारी प्रवीण धिमन यांनी उपस्थित कॅडेटच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं असेही त्यांनी आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी अध्यक्ष स्थानावरून सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांबद्दल अभिमान आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देश सेवेसाठी पाठवले, या साठी पूर्ण देश तुमचा ऋणी राहू इच्छितो असे म्हणत यशस्वी मुलांच्या पालकांना धन्यवाद दिले. स्वतःच्या कुटुंबासाठी लोक जगत असतात. पण महाविद्यालयात तिल मुले देशाच्या रक्षणासाठी गेले ही खूप अभिमानाची बाब आहे, असेही प्राचार्य म्हणाले.
सूत्रसंचालन पल्लवी शिंपी यांनी तर आभार लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला कॅप्टन कमल पाटील, लेफ्टनंट योगेश बोरसे ,प्रा डॉ.राहूल संदनशिव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नवल चौधरी, कल्पेश ओतारी, शुभम थोरात,विशाल पाटील,कोमल पाटील,प्रियंका ठाकूर,चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेले विद्यार्थी
दुर्गदास कौतिक गायकवाड (पोस्ट- जीडी जनरल ड्युटी,गोवा), राहुल सुधाकर पाटील (पोस्ट- जीडी जनरल ड्युटी, मराठा ली, बेळगाव), दिनेश विनायक पाटील (पोस्ट- जीडी जनरल ड्युटी, मराठा ली, बेळगाव), जयेश राजेंद्र पाटील (पोस्ट- बेळगाव किर्कि, पुणे), आकाश रामप्रकाश शर्मा (पोस्ट- कोंबॅक्ट अविशन, नाशिक), तेजस प्रमोद जाधव (आर्टिलरी एनआरसी १७० नाशिक) यांच्यासह लेफ्टनंट राहूल अरुण पाटील याची निवड अधिकारी रँकला झाली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व चाचण्या पार करून त्यांची निवड अलाहाबाद सेंटर मध्ये झाली होती.
त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण चेन्नईतील प्रशिक्षण अकादमीत झाले. २१ नोव्हेंबर ला प्रशिक्षण पूर्ण करून ते आता इंफंट्री १/३ गोरखा रेजिमेंट येथे रुजू होणार आहेत.







