अकोला ( प्रतिनिधी ) – राजकीय नेत्यांच्या घरी सध्या ईडीच्या धाडीचे सत्र सुरू आहे. अशातच अकोल्यातील माजी आमदाराच्या बंगल्यात एक व्यक्ती कार घेवून आली. आयबीकडून आलो असल्याचे सांगितलं. वाहनांची व घराच्या कागदपत्रांची माहिती मागण्यास सुरुवात केली. मात्र हा व्यक्ती बनावट अधिकारी असल्याचे लक्षातच येताच खदान पोलिसांत तक्रार देण्यात आली.
अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा बंगला आहे. बंगल्यात एक कार अचानक पहिल्या माळ्यावरील पार्कींगमध्ये थेट गेली. कारचा क्रमांक एमएच 04 एफयू 0919 आहे. कारमधून एक व्यक्ती उतरून थेट माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांचे बंगल्याचे समोरील बाकावर जावून बसतो. त्याला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया यांना संशय आला
यश आणि त्यांचे काका संजय बाजोरीया व सुनील बाजोरीया यांनी विचारपूस केल्यावर त्याने आपण आयबीचा माणूस आहे असे सांगून सर्व गाड्यांची कागदपत्रे तसेच चाव्या मागितल्या आणि बाजोरिया यांच्या नातवासोबत वाद घातला . त्याचा संशय आल्याने ओळखपत्र मागितल्यावर त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला दरम्यान त्या व्यक्तीचे नाव प्रतीक संजयकुमार गावंडे असे समजले
यश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतीक संजयकुमार गावंडे याच्याविरुद्ध भांदविचे कलम 452, 506 नुसार गुन्हा दाखल केला आरोपी प्रतीक संजयकुमार गावंडे याला वाहनांवर असलेल्या फॅन्सी व युनिक नंबरचे फोटो काढण्याचा छंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या वाहनांचे छायाचित्र काढण्यासाठी बंगल्यात जातो. माजी आमदार बाजोरिया यांच्या बंगल्यातही तो यासाठीच गेला असावा, अशी माहिती आहे.