अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कावपिंप्री येथे शेतात रोटाव्हेटर करत असताना ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील कावपिंप्री येथील शेतकरी सतीश निंबा पाटील (वय ३६) हे आज १९ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास शेतात ट्रॅक्टरवर रोटाव्हेटर करत होते. . शेतावरील बांधाजवळ ट्रॅक्टर वळवत असताना बांधाजवळ नाल्याचा अंदाज न आल्याने रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबून सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
सतीश पाटील हे रोजंदारीने काम करत असत. सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.