एरंडोल (प्रतिनिधी) – अंतुर्ली गावातील तरुणाचा उत्राणजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी चारचाकी वाहनाने धडक देऊन फरफटत नेले. त्यानंतर जखमी झालेल्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यास ठार केले. फिल्मीस्टाईल घडलेल्या घटनेत कासोदा पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील सचिन उर्फ देविदास पाटील (वय ३९) हा रविवारी १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घरातून कुणास काही एक न सांगता आपल्या बुलेट दुचाकीवरुन गिरणा नदीपात्रातील उत्राणकडे जाण्यासाठी निघाला होता. दर्ग्याजवळ आल्यानंतर मोटारसायकलवर सचिन पाटील उभा होता. त्याच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो वाहनाने बुलेटसह त्यास जोरदार धडक दिली. त्यात तो १५ ते २० फुट फरफटत गेला. सचिन हा बुलेटहून खाली कोसळून जखमी झाल्यावरही अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या छातीवर, मानेवर व बरगड्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन ठार केले.
काही वेळाने सचिनच्या चुलत भावास घटनास्थळाहून फोन आल्यानंतर तो घटनास्थळी पोहचला. त्याला सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याला पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्यांला मृत घोषीत केले. मयत सचिन यांचे पश्चात आई, एक भारतीय सैन्य दलात सेवा देत असलेला भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून अज्ञात मारेकऱ्यांचा कासोदा पोलिस शोध घेत आहेत.