जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेचा केळी पिकावर फवारणी करत असताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने विषबाधा झाली होती. दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील नांदगाव येथे जिजाबाई सोनवणे (वय-५५ ) या आपल्या परिवारासह राहायला होत्या. शेतीचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करत होते. २ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या नांदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधाचे फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार घेत असताना शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.