पुणे ( प्रतिनिधी ) – पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्याचा गळा चिरुन हत्या केली.
आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा राग मुलाला होता. त्यातूनच मुलानं हत्येचा कट रचला. पाच वर्षांपासून आईशी विवाहबाह्य संबंध मुलाला खटकत होते. अखेर मुलाने या व्यक्तीचा काटा काढला. त्या इसमाला निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात ही घटना घडली . हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीपक वाघमारे आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास केला जातोय.
मयत दीपक हा वडील आणि अल्पवयीन मुलगा घराबाहेर गेले, की आईला भेटायचा. ही बाब अल्पवयीन मुलाला खटकली होती. याचा राग मुलाच्या मनात खदखदत होता.
एका व्यक्तीकडे पैसे आणण्यासाठीचा बहाणा करत दीपकला अल्पवयीन मुलानं बोलावून घेतलं. त्यानंतर दीपकला हा मुलगा एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथं त्यानं दीपकचा गळा चिरला आणि त्याचा खून केला. यानंतर मुलगा पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दीपका मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलागा हत्येवेळी नशेत होता, अशीही माहिती समोर आली आहे. हा मुलगा एका किराणामालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.