नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने त्याचे पालन आणि मदत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.
पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचे सांगितले. तसेच न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.