पाचोरा पोलिसांची धडक कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गुप्त बातमीवरून केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त करत एक तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत एकूण १८ तलवारी हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत अंदाजे ५४ हजार इतकी आहे. ही कारवाई पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.
पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात काही तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा येथील राहणारा सोहेल शेख तय्युब शेख (वय २४ वर्षे) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या एकूण १८ तलवारी जप्त करण्यात आल्या असून, काही तलवारी आधीच विकल्या गेल्याचेही त्याने कबूल केले आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोलीस नाईक संदिप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांनी केली.