मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर साधू हत्याकांडप्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. मात्र त्याआधीच राम कदम यांना त्यांच्या १०० कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राम कदम आज सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार होते.
दरम्यान राम कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘ हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
‘ मी स्पष्टपणे सांगतो, पालघरमध्ये ज्याप्रकारे साधुंची हत्या झाली. त्या वयोवृद्ध साधुंचा आक्रोश आज देखील हा देश विसरलेला नाही. प्रत्येक आखाड्यात सर्व साधु-महंत आज देखील त्यामुळे संतप्त आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर असल्याने कुणी रस्त्यावर उतरलं नव्हतं. पण आज आम्ही सुरूवात केली आहे. येणाऱ्या काळात लोकं महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं अशी मागणी केली जाईल.’







