मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. यापूर्वी देखील राणावत भगिनींना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजवाले होते. मात्र तरी देखील या बहिणी चौकशीसाठी हजर राहिल्या नाही.

कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून भावाच्या लग्नात बिझी होती. याचमुळे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावूनही ती चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. मात्र आता मुंबई पोलिसांनी कंगना व तिची बहीण रंगोली यांना तिस-यांदा समन्स बजावला आहे.
कंगनाला 23 नोव्हेंबर तर रंगोलीला 24 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास बोलवण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे. कंगना आणि रंगोली यांनी मागील काही काळात बॉलीवूडसंदर्भात केलेले अनेक ट्विट वादग्रस्त ठरले.
हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. मोहम्मद इकबाल सैयद असं याचिकाकर्त्याचे नाव आहे.







