जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील डिकसाई गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली दि. १५ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी मंगळवार १६ मे रोजी रात्री उशिरा दुचाकी धारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू उर्फ पिंटू दोधू पाटील (वय ४०, रा. डिकसाई ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. राजू पाटील हा तरूण सोमवारी १५ मे रोजी रात्री ८ वाजता विदगाव येथून डिकसाईकडे पायी जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरील जोशी यांच्या शेतासमोरून जात असताना मागून येणारी दुचाकी (एमएच १९ एएल २९७९) याने जोरदार धडक दिली. या धडकेत राजीव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघातप्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रदीप सज्जन चव्हाण रा. डिकसाई याने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक समाधान संजय नाईक रा. डिकसाई याच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी १६ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.