जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वेच्या कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस या धावत्या गाडीमध्ये मनमाड ते चाळीसगाव दरम्यान एका कॉलेज बॅगमधील अज्ञात संशयास्पद वस्तूचा स्फोट झाला. यात अजय अशोक मगरे नामक ३० वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना घडली. मात्र बॅगधारक व्यक्ती चाळीसगाव येथे पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून गोरखपूर कडे जाणारी रेल्वे क्रमांक २२५३८ डाऊन कुशीनगर सुपर फास्ट एक्सप्रेसच्या इंजिनपासून चौथ्या अनारक्षित डब्यात एका संशयित बॅगमधील घातक वा रासायनिक पदार्थाचा स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान मनमाड ते चाळीसगाव मध्य रेल्वे स्थानकादरम्यान घडली. संशयित बॅग जप्त करीत पाचोरा स्थानकांवरील जीआरपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. रेल्वेमधील सुरक्षा कर्मी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार सिंग आणि पाचोरा जीआरपी पोलिसांनी सांगितले.