जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील विदगाव – ममुराबाद रस्त्यावरून मजुर घेवून येणारा भरधाव क्रुझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक मजूराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया पोस्ट वासूडी येथील जगदीश जंगलू पावरा याने जळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या वेअर हाऊस कंपनीत ट्रक मधील गहू व तांदूळाचे पोते उतरविण्याचे ठेका घेतला आहे. त्याच्या गावातील काही मंजूरांना सोबत क्रुझरने सोबत घेवून हमालीचे काम करतात. जगदीश पावरा हा क्रुझर गाडी चालवित असल्याने दररोज मजूरांना ने – आण करण्याचे काम करत असतो. नेहमीप्रमाणे सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्व मजूर गाडीत बसून जळगावकडे रवाना झाले. त्यावेळी वाहन जगदीश पावरा हा वाहन चालवित होता. जळगाव तालुक्यातील विदगाव – ममुराबाद दरम्यानच्या रस्त्यावरून येत असतांना वाहनावरील चालक जगदीश पावरा याचे वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन हे थेट झाडावर आदळून बाजूच्या चारीत पडली. या अपघातात कांतीलाल हिरालाल पावरा (वय – २६) रा. चांदसुरिया पोस्ट वासूडी, ता. शिरपूर जि.धुळे याचा जागीच मृत्यू झाला. तर रणजित उर्फ राजा जयसिंग पावरा (वय – २४), गोकूळ वनासिंग भिल (वय – ३०), वांगऱ्या कालूसिंग पावरा (वय – ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास शिंदे यांनी घटनास्थळी गेले असता, मयताचा भाऊ शांतीलाल हिरालाल पावरा याच्या माहितीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.