मुंबई ( प्रतिनिधी ) – संपत्तीच्या वादातून एका ५५ वर्षांच्या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात सुनावणी सुरू असतानाच आत्महत्येचा प्रयत्न केला. तुषार शिंदे असे या माजी सैनिकाचे नाव आहे. आईशी सुरू असलेल्या संपत्तीच्या वादातुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
न्या प्रकाश नाईक यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. मात्र आदेश विरोधात गेल्याने त्यांनी न्यायामूर्तींच्या दिशेने जाऊन कटरने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती आहे. न्यायालयात उपस्थित वकील आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासणी करूनच उच्च न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे कटर घेऊन शिंदे आत कसे गेले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.