जालौर (वृत्तसंस्था) – राजस्थानातील जालौरपासून 7 किलोमीटर दूर महेशपुरा गावात शनिवारी झालेल्या भीषण अपघाताचं वृत्त ऐकून सगळा देश हळहळला. हायटेन्शन लाइनच्या संपर्कात आल्यानं अख्खी बस प्रचंड वीजप्रवाह आणि आग अशा दुहेरी पकडीत सापडली.

यात 6 जण जागीच ठार झाले तर 36 जण जखमी झाले. गुगल मॅपवर पाहताना गडबड झाल्यानं हा विचित्र अपघात घडला अशी माहिती समोर आली आहे. याचं सविस्तर वृत्त आता इतरांकडून समोर येत आहे. ही बस जैन भाविकांना विविध श्रद्धास्थळं दाखवायला घेऊन जात होती.
अपघातातून वाचलेल्या भाविकांनी सांगितल्यानुसार, बस नाकोडा गावानंतर मांडोली इथं दर्शन करायला निघाली होती. संध्याकाळी ते जालोर शहरात पोचले. इथं जेऊन ब्यावरला जायचं होतं. ब्यावरला जायचा रस्ता गूगल मॅपवर पाहत बस पुढं सरकत होती. दरम्यान रस्ता चुकून बस महेशपुरा गावात पोचली. यानंतर इथंच अपघात झाला.
बस गावातील अरुंद गल्ल्यांमध्ये शिरली. तिथून निघताना गल्लीत 11 केवीची लाइन खूप खाली होती. बसचा चालक तार पाहण्यासाठी वर चढला. यादरम्यान चालकाचा हात या तारेला लागला. तात्काळ सगळ्या बसमध्ये वीज पसरली. ड्रायव्हरसह इतर सहा जण यात जागीच मृत्युमुखी पडले. बसमध्ये असलेले प्रवासी एकदुसऱ्यांना पकडायला लागले तसं वीजप्रवाह पसरत गेला. आख्खी बस जाळून गेली. जखमींना गावकऱ्यांनी लगोलग हॉस्पिटलमध्ये पोचवलं. बस पूर्णतः जळून खाक झाली.
इतर लोकांना महेशपुरा गावातील एका घरात थांबवलं गेलं. अपघातात 36 हून जास्त लोक होरपळून गेले. बसमध्ये आग इतकी पसरली, की कुणीच आपलं सामान बाहेर काढू शकलं नाही.
15 जानेवारीलाही हुबळी धारवाड मार्गावर एक भयानक अपघात झाला. मीनी बस आणि ट्रक एकमेकांना धडकले. त्यात तब्बल 10 महिला आणि एक ड्रायव्हर जागीच ठार झाले. हे लोक गोव्याला जात होते.






