ढाका (वृत्तसंस्था) – बंगालच्या उपसागरात बांगलादेशातील हातीयाजवळ शनिवारी एक हलके जहाज बुडाले. ‘एमव्ही अख्तर बानो’ या जहाजात असणारे 13 नाविक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बांगलादेशच्या हातीयाजवळ पटेंगा समुद्र किनाऱ्यापासून 40 सागरी मैल दूर खवळलेल्या समुद्रात हे जहाज बुडाले. हे जहाज 2000 टन गहू घेऊन चालले होते.
हे जहाज बुडाल्यानंतर बांगलादेशचे तटरक्षक दल आणि नौदल शोध मोहीम राबवित आहेत. या भागात सागरी प्रवाह जोरदार असल्याने त्यांची टीम घटनास्थळी पोहोचू शकली नाही, असे तटरक्षक दलाच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. शनिवारी त्याच वेळी साखर वाहून नेणारे आणखी एक जहाज भाशंचरजवळ बुडाले परंतु त्यातील चालक दलातील सदस्यांना वाचविण्यात यश आले. बंदरच्या बाहेरील नांगर टाकलेल्या मोठ्या जहाजातून आणलेल्या मालाची किनाऱ्यापर्यंतची वाहतुक या छोट्या जहाजांमधून केली जाते.







