जळगाव (प्रतिनिधी) – जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे याकरिता एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन बस स्थानकाच्या आवारात आज दि.बुधवारी 16 रोजी घोषणा देत आंदोलन केले. वेतन न मिळाल्यास त्यांनी उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.

विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे पगार न मिळाल्यामुळे कुटुंबांचे हाल होत आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन करण्यात यावे. यापुर्वी देखील दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने बुधवारी आंदोलन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनी टाळेबंदी काळात 33 टक्के नुसार सोपविलेले कर्तव्य पार पाडले आहे. कर्मचार्यांना पोटासाठी मोलमजुरी देखील करावी लागत आहे.
त्यामुळे कर्मचारी व कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.







