जळगाव (प्रतिनिधी) – औद्योगिक वसाहत परिसराशेजारील सुप्रिम कॉलनी भागात एका विवाह समारंभात आईसोबत आलेल्या ६ वर्षीय चिमुरडीवर २५ वर्षीय तरूणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्न समारंभात आई व्यस्त असताना नराधमाने चिमुकलीला आमिष दाखवत शेजारील घराच्या एका खोलीत नेले. तेथे त्याने चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकली किंचाळत होती. तर नेमकी तिची आई शोध घेत होती. चिमुकलीची आई शोध घेत नेमकी त्या खोलीजवळ पोहोचली. चिमुकलीच्या किंचाळण्याचे आवाज आईच्या कानी पडल्यावर तिने जोरजोरात दरवाजा ठोठावला. चिमुकलीच्या आईची आरडाओरड कानी पडल्याने चिमुकलीला खोलीत सोडून नराधम पसार झाला. यानंतर लग्नातील व-हाडी मंडळींनी एकच गर्दी केली. यानंतर सहा वर्षीय चिमुकलीला घेऊन नातेवाईक व कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यापूर्वीच कथित समाजसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. आपल्यात वाद नको, म्हणत पिडीतेच्या पालकांवर दबाव आणला जात असताना यापूर्वी असाच प्रकार घडलेल्या दुस-या एका पिडीतेचे पालकही पोलीस ठाण्यात धडकले. आमच्याही मुलीसोबत अर्शद नावाच्या नराधमाने गैरप्रकार केल्याचे त्यांनी सांगितले.
याचदरम्यान, पिडीतेच्या आईने पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानतंर पोलिसांनी अर्शद ऊर्फ अरबाज पटेल ऊर्फ बच्चन (२५, रा. सुप्रिम कॉलनी) याला सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक अल्ताफ पठाण, सुधीर साळवे, राहुल रगडे, इम्रान सय्यद, यांनी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहनाला थांबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले.