धरणगाव (प्रतिनिधी) – नायब तहसीलदारासह कोतवालाला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात २५ हजाराची लाच घेताना ते रंगेहाथ सापडले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नायब तहसीलदार जयवंत पुंडलिक भट (वय-५१ वर्ष,रा. काळकर गल्ली,एरंडोल)आणि कोतवाल राहूल नवल शिरोळे (वय-३०,रा.पाळधी, ता.धरणगाव) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आणि डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाला राहूल नवल शिरोडे यांनी सुरूवातीला तक्रारदाराला ३० हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २५ हजार रूपये देण्याचे ठरविले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवारी १६ मार्च रोजी दुपारी सापळा रचला. यावेळी नायब जयवंत पुंडलिक भट व कोतवाल राहूल नवल शिरोळे हे तक्रारदारकडून २५ हजाराची लाच घेतांना पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली. एसीबी पथकाने केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.