जळगाव(प्रतिनिधी) – “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम मा. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा श्रीमती पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आरोग्य पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे.



पाळधी येथे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जि. प. अध्यक्षा श्रीमती पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, प्रांताधिकारी गुरव, तहसीलदार देवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, ता. आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील या सर्वांच्या उपस्थितीत पाळधी येथे मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मोहिमेची पहिली फेरी दि.१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २०२० पर्यंत एकूण २५ दिवस आहे. तसेच मोहिमेची दुसरी फेरी दि. १२ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० एकूण १२ दिवस आहे. या कालावधीत मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व स्वयमसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी असे आरोग्य पथक ( टीम) तयार करण्यात आले असून हे पथक घरांना भेटी देऊन घरातील व्यक्तींचे व ५० वर्षावरील व्यक्तींचे तापमान जास्त (ताप १००.४ अंश फँ. किंवा जास्त) व ऑक्सिजन लेवल कमी ( SPO2 ९५% पेक्षा कमी) असे व्यक्ती आढळल्यास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच तीव्र श्वसनाचे आजार ( SARI ) आणि फल्यू सदृश्य आजार ILI रुग्ण आढळल्यास कोविड चाचणी व उपचार करण्यात येणार आहेत. भेटीदरम्यान तापमान जास्त, ऑक्सीजन लेव्हल कमी, खोकला, आणि इतर लक्षणे असणाऱ्या, व कोमॉरबिड रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना संदर्भित करण्यात येणार आहे.







