जळगाव (प्रतिनिधी) – कामावरून घरी जात असतांना रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला रिक्षाने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रविंद्र मधुकर जोशी (वय-४०) रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कांलनी हे एमआयडीसी कंपनीत मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात होते. जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील हांटेल त्रिमुर्तीजवळ उभा असलेला ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी ५२२९) वर रिक्षा आदळली. यात चालकासह रविंद्र जोशी हे गंभीर जखमी झाले. रविंद्र जोशी यांना गंभीरवस्थेत तातडीने देवकर कॉलेज प्रांगणातील शासकीय सामान्य रूग्णालयात दाखल केले होते.
मात्र, वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी त्यांना उपचार दरम्यान मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी रस्त्यावरील ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालक फरार झाला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.